लांजा : भाजीमार्केटमध्ये हायटेक जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 92 हजारांचा मुद्देमाल जप्त, संगणक, टीव्ही, प्रिंटरसह जुगाराचे साहित्य हस्तगत

banner 468x60

लांजा येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत लांजा भाजीमार्केट परिसरात सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर लांजा पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत संगणकीय साहित्य, टीव्ही संच, प्रिंटर, रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी एका संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मितेश प्रकाश गावडे (वय ४०, रा. मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गालगत मुकुंद वडापाव स्टॉलशेजारील भाजीमार्केट परिसरात मुकुंद भिवा वाघधरे यांच्या मालकीच्या गाळ्यामध्ये विनापरवाना जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना पैशांची बाजी लावून ‘फन टार्गेट’ आणि ‘लकी १२ कार्ड’ यांसारखे ऑनलाइन जुगाराचे प्रकार खेळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती समोर आली.


या माहितीच्या आधारे महिला पोलीस शिपाई प्रतीक्षा नितेश राणे यांच्या पथकाने ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास संबंधित गाळ्यावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी दोन ३२ इंची टीव्ही, डेल व लेनोव्हा कंपनीचे सीपीयू, दोन इप्सॉन प्रिंटर, एचपी की-बोर्ड, माऊस, दोन बारकोड स्कॅनर, कुलर, जुगाराच्या तीन पावत्या आणि ६ हजार ८१० रुपयांची रोख रक्कम असा एकूण ९२ हजार ४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४(१)(अ), ४(१)(क) आणि १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास धाकू जाधव पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *