हर्णै : बंदरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान 2026’ उत्साहात, नागरिक, विद्यार्थी आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग

banner 468x60

हर्णै ग्रामपंचायत हर्णै, Seva Charitable Trust Harnai आणि JNK Marine Aqua Life यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२६’ उत्साहात राबविण्यात आले. ‘स्वच्छ भारत, विकसित भारत’ या संदेशातून राबविण्यात आलेल्या या अभियानात नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सोमवारी (२१ सप्टेंबर) सायंकाळी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या मोहिमेत हर्णै बंदर परिसरातील प्लास्टिक व कचरा संकलित करून स्वच्छता करण्यात आली. यासोबतच नदी, खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखणे, पर्यावरण संवर्धन तसेच स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यात आली.

‘आपला समुद्र, आपली जबाबदारी’ आणि ‘चला, एकत्र येऊया; हर्णै स्वच्छ करूया!’ या संदेशातून नागरिकांना पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

या अभियानाला जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या धाडवे, गटविकास अधिकारी मंडलिक, सहाय्यक गटविकास अधिकारी मर्चंडे, विस्तार अधिकारी खांडके व भुसारे, हर्णै ग्रामपंचायत प्रशासक मोहिते व कर्मचारी, माजी सरपंच महेश पवार, हर्णै तलाठी अक्षय पाटील, वनरक्षक प्रभू साबणे, सर्पमित्र सुरेश खानविलकर व किरण करमरकर यांची उपस्थिती होती.

तसेच अंगणवाडी व आशा सेविका, एन. डी. गोळे हायस्कूल आणि नॅशनल हायस्कूल हर्णै येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच हर्णैतील ज्येष्ठ नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

पर्यावरण जनजागृतीसाठी ज्येष्ठ पत्रकार डॉ. प्रशांत परांजपे, निवेदिता प्रतिष्ठानच्या सदस्या वैष्णवी मराठे वैद्य, गायत्री अय्यर, श्री. अय्यर आणि अविनाश खुळे (दापोली) यांचीही उपस्थिती होती.

या उपक्रमातून केवळ हर्णै बंदराची स्वच्छता करण्यापुरते मर्यादित न राहता समुद्र, खाडी, जलचर आणि स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विशेषतः नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या अभियानाचे प्रमुख आकर्षण ठरले.

ग्रामपंचायत हर्णै, Seva Charitable Trust Harnai आणि JNK Marine Aqua Life यांच्या संयुक्त पुढाकारातून झालेल्या या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी आणि मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *