दापोली : साखळोलीत ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ प्रात्यक्षिक; कृषी संगिनी समूहाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

banner 468x60

दापोली | प्रतिनिधी : सागर गोवळे

ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी संगिनी समूहाच्या वतीने दापोली तालुक्यातील साखळोली नं. २ येथे शेतकऱ्यांसाठी ‘एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन’ (IPDM) या विषयावर विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण, उत्पादनवाढ आणि पर्यावरणपूरक शेतीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

banner 728x90

कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले. पी. डी. पोटफोडे यांनी शेतकऱ्यांना IPDM तंत्रज्ञानाचे महत्त्व समजावून सांगितले. पिकांवरील कीड व रोगांची सुरुवातीच्या अवस्थेतच ओळख पटविण्यासाठी नियमित निरीक्षण करणे, आर्थिक नुकसान पातळी (ETL) लक्षात घेऊनच नियंत्रण उपाययोजना राबविणे, तसेच विविध प्रकारच्या कीड सापळ्यांचा प्रभावी वापर करण्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जैविक नियंत्रण पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करण्यावर भर देण्यात आला. रासायनिक कीटकनाशकांचा केवळ आवश्यकतेनुसार आणि संतुलित प्रमाणात वापर केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, पर्यावरणाचे संरक्षण होते आणि पिकांचा दर्जाही सुधारतो, असे मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी संगिनी समूहाने प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक सादर करून IPDM तंत्रज्ञानाची अंमलबजावणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक दाखविले. पिकांची नियमित पाहणी, योग्य वेळी रोग व किडींची ओळख आणि तातडीने उपाययोजना केल्यास मोठ्या प्रमाणावरील नुकसान टाळता येते, असा संदेश या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आला.

कार्यक्रमास साखळोली परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी तज्ज्ञांकडे शेतीविषयक विविध प्रश्न मांडून त्यांचे समाधानकारक निरसन करून घेतले. कृषी संगिनी समूहाचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करत, अशा मार्गदर्शनामुळे आधुनिक व शाश्वत शेतीला चालना मिळून उत्पादनवाढीस निश्चितच हातभार लागेल, असा विश्वास शेतकरी वर्गाने व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *