गुहागर तालुक्यातील रानवी येथील टेलिफोन एक्सचेंजच्या डीसी पॉवर प्लांट रूममध्ये घरफोडी करून तांब्याची केबल आणि बसबार प्लेट चोरीला नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण २५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत रानवी येथील टेलिफोन एक्सचेंजच्या डीसी पॉवर रूममध्ये ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून कार्यालयात प्रवेश केला आणि तेथील साहित्य चोरून नेले.
या घटनेत सुमारे ५० मीटर लांबीची, लाल आणि निळ्या रंगाची १५० स्क्वेअर एमएम क्षमतेची जुनी वापरती डीसी पॉवर कॉपर केबल, ज्याची किंमत २५ हजार रुपये आहे, तसेच ४५० रुपये किमतीची डीसी-डीबी बॉक्सची जुनी वापरती बसबार प्लेट असा एकूण २५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
या प्रकरणी विजेंदर गलेरिया (वय ३८, व्यवसाय : बीएसएनएल ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ते मूळचे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील असून, सध्या गुहागर तालुक्यातील गरववाडी येथे वास्तव्यास आहेत.
या फिर्यादीवरून गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.४७ वाजता नोंदवण्यात आला.
टेलिफोन एक्सचेंजमधील महत्त्वाच्या विद्युत उपकरणांशी संबंधित केबल चोरीला गेल्याने या घटनेची दखल घेण्यात आली आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध घेणे आणि चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, या दृष्टीने पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













