Breaking News
दाभोळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे यांची मुंबईला बदली, पावणे तीन वर्षांच्या सेवेनंतर दाभोळमधून निरोप, मनमिळावू स्वभाव, पत्रकारांशी समन्वय आणि सहकार्याची भूमिका यामुळे अमोल गोरे यांची वेगळी ओळख लांजा : जंगली श्वापदांच्या शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या दोघांवर लांजा पोलिसांची कारवाई; 12 बोअरची बंदूक, चार जिवंत काडतुसे जप्त दापोली : जेसीआय दापोली मॅरेथॉनमध्ये स्वराज जोशी, सई चव्हाण यांचे विजेतेपद, 247 धावपटूंचा सहभाग दापोली : शिरशिंगेत वन्यजीव सप्ताहानिमित्त देशी वृक्षलागवड, निसर्ग संवर्धनाचा दिला संदेश रत्नागिरी : पावसात, जंगलात बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांना आता ‘टेंट’चा आधार

दापोली : जेसीआय दापोली मॅरेथॉनमध्ये स्वराज जोशी, सई चव्हाण यांचे विजेतेपद, 247 धावपटूंचा सहभाग

banner 468x60

आरोग्य, शांतता आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी जेसीआय दापोलीतर्फे आयोजित करण्यात आलेली ‘जेसीआय दापोली मॅरेथॉन २०२६ – सिझन ३’ ही स्पर्धा शनिवार, १० ऑक्टोबर रोजी आझाद मैदान, दापोली येथे उत्साहात पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मॅरेथॉनमध्ये तब्बल २४७ धावपटूंनी सहभाग नोंदवला. ५ किलोमीटर पुरुष गटात स्वराज जोशी, तर महिला गटात सई चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळवले.

या मॅरेथॉनमध्ये ५ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत १४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये १२४ पुरुष आणि २२ महिलांचा समावेश होता. तसेच २ किलोमीटर फन रनमध्ये ७८ पुरुष आणि २३ महिलांसह एकूण १०१ धावपटू सहभागी झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याने स्पर्धेला विशेष रंगत आली.

स्वराज जोशी, सई चव्हाण यांची बाजी

५ किलोमीटर पुरुष गटात स्वराज जोशी यांनी प्रथम, यश शिर्के यांनी द्वितीय, तर अथर्व चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात सई चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दीक्षा कडू यांनी द्वितीय, तर पूजा राजभर यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

२ किलोमीटर फन रनच्या पुरुष गटात पवन गौड यांनी प्रथम, सुनील रेवाळे यांनी द्वितीय, तर राज राजेशिर्के यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात वैदेही गुरव यांनी प्रथम, सोनाली भागणे यांनी द्वितीय, तर जानवी कांबळे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

विजेत्यांना आकर्षक चषक, पदके, प्रमाणपत्रे आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ५ किलोमीटर स्पर्धेतील पुरुष व महिला गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये, तर २ किलोमीटर फन रनमधील विजेत्यांना अनुक्रमे १ हजार, ७५० आणि ५०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना सहभाग प्रमाणपत्रे देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसह चिमुकल्यांचाही सहभाग

या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे साठ वर्षांवरील नऊ ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग. वयाची मर्यादा बाजूला ठेवून आरोग्याप्रती असलेली जिद्द आणि व्यायामाची आवड त्यांनी आपल्या सहभागातून दाखवून दिली. त्यांच्या उत्साहाचा गौरव करत त्यांना विशेष पदके प्रदान करण्यात आली.

दहा वर्षांखालील जवळपास १४ लहान मुलांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याबरोबरच विविध वयोगटांतील नागरिकांना एकत्र आणण्यात या उपक्रमाला यश आले.

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका साधना बोत्रे, मुख्य प्रायोजक पितांबरी प्रॉडक्ट्सचे पराग साळवी, अरुण गांधी आणि जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता उपस्थित होते. मान्यवरांनी ध्वज दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.

या स्पर्धेला पितांबरी प्रॉडक्ट्सचे मुख्य प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले. दापोली पोलीस बांधवांनी स्पर्धेच्या नियोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. सूरज शिगवण यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तर प्रांत कार्यालयाकडूनही विशेष सहकार्य मिळाले.

जेसीआय दापोलीच्या टीमचे आयोजन

मॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी एचजीएफ रोशन वेदक, प्रकल्प अध्यक्ष जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, प्रकल्प संचालक जेसी फैझान पुरकर, प्रकल्प समन्वयक जेसी पार्थ साबळे, जेएफएम तेजस मेहता, जेसीएचजीएफ सीए ऋषिकेश शेठ, जेसी निहाल शिरगावकर आणि जेसीआय दापोलीच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेएफडी कुणाल मंडलिक यांनी केले. स्थानिक माध्यम प्रतिनिधींनीही उपस्थित राहून या उपक्रमाला प्रसिद्धी दिली.

आरोग्य, क्रीडा, शांतता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारी ही मॅरेथॉन जेसीआय दापोलीच्या जनसंपर्क उपक्रमातील महत्त्वपूर्ण ठरली. धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि प्रायोजकांचे पाठबळ यामुळे स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. ‘रन फॉर पीस, रन फॉर दापोली’ या घोषवाक्याच्या माध्यमातून दापोलीकरांना आरोग्यदायी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आणि शांततेचा संदेश जपण्याचे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *