चिपळूण : सावर्डे येथे झाड कोसळून वीजपुरवठा आणि वाहतूक खंडित

banner 468x60

चिपळूण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सावर्डे येथील ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिराजवळ मंगळवारी मध्यरात्री मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला, तर वाहतूकही काही काळ ठप्प झाली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास हे झाड कोसळल्याने ग्रामदैवत श्री केदारनाथ मंदिर, उदेगवाडी, स्मशानभूमी, शंकर मंदिर तसेच केदारनाथ कॉलनीकडे जाणारा मुख्य मार्ग पूर्णपणे बंद झाला. रस्त्यावर झाड आडवे पडल्याने वाहनांची ये-जा थांबली आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे काही काळ संपूर्ण परिसर अंधारात होता. घटनेची माहिती मिळताच महावितरण विभागाचे कर्मचारी तेजस कुंभार, प्रसाद गुरव, तन्मय बागवे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी भर पावसात आणि अंधारात तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यांच्या तत्परतेमुळे सुमारे एका तासात तात्पुरता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला.

बुधवारी सकाळी स्थानिक ग्रामस्थ आणि संबंधित यंत्रणांनी रस्त्यावर पडलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी महावितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी कार्यरत असून दुरुस्तीचे काम सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे तालुक्यात अशा घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *