मंडणगड तालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदी परिसरात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पांडुरंग दशरथ जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह सुर्ले येथील निवळी नदी परिसरात मासेमारीसाठी गेले होते. नदीतील पाणी कमी झाल्याने ते डोहात मासे पकडत असताना त्यांच्यासोबत असलेला कुत्रा नदीकाठावरील झुडपांच्या दिशेने सतत भुंकत होता.
संशय आल्याने जाधव यांनी कुत्रा भुंकत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आला. मृतदेहावर माशा घोंगावत होत्या तसेच शरीरावर किडे पडल्याचेही निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ भिंगळोली येथील पोलीस पाटील संतोष मळेकर यांना मोबाईलद्वारे माहिती दिली.
त्यानंतर संबंधित पोलीस पाटलांनी सुर्ले येथील पोलीस पाटलांना याबाबत कळविले. त्यांनी घटनास्थळी व्यक्ती पाठवून खात्री केली. त्यानंतर मंडणगड पोलीस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार नोंदविण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे मंडणगड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक १०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्ती अंदाजे ४५ ते ५५ वयोगटातील पुरुष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, अज्ञात मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी मंडणगड पोलीसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













