दापोली : कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता अभियान, ग्रामस्थांसह मुंबईकरांचा उत्स्फूर्त सहभाग, संपूर्ण आठवडा स्वच्छता सप्ताह म्हणून साजरा करण्याचे आवाहन

banner 468x60

आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून १९ सप्टेंबर रोजी कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने कर्दे समुद्रकिनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला स्थानिक ग्रामस्थांसह मुंबईहून आलेल्या ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

कर्दे समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत समुद्रकिनाऱ्यावरील कचरा आणि इतर टाकाऊ वस्तू हटविण्यात आल्या. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या समुद्रकिनारा स्वच्छता मशीनचा या अभियानासाठी विशेष वापर करण्यात आला.

जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी ही मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्दे ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.


स्वच्छता अभियानाचे उद्घाटन कर्दे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी, ग्रामसेवक, माजी सरपंच सचिन तोडणकर, पंचायत समितीच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी पूजा देवकर आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले.

या अभियानात ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले. स्थानिक नागरिकांसोबतच मुंबईतून गावात आलेल्या ग्रामस्थांनीही पुढाकार घेतल्याने स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी माजी सरपंच सचिन तोडणकर यांनी अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. तसेच केवळ एका दिवसापुरती स्वच्छता मोहीम न ठेवता संपूर्ण आठवडा ‘स्वच्छता सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कर्दे समुद्रकिनारा हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याची स्वच्छता आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांसोबतच पर्यटकांचीही असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत कर्दे समुद्रकिनारा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व स्थानिक तसेच मुंबईकर ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीच्या वतीने कृतज्ञतापूर्वक आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *