बहुविकलांग आणि गतिमंद मुलांच्या शिक्षण, संगोपन आणि पुनर्वसनासाठी आपले आयुष्य समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सहा महिला कर्मचाऱ्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेसीआय दापोलीच्या वतीने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम राबविण्यात आला. आनंद फाऊंडेशन संचलित बहुविकलांग व गतिमंद मुलांचे पुनर्वसन व शिक्षण केंद्र, जालगाव, दापोली येथे १५ सप्टेंबर रोजी जेसीआय सप्ताहाच्या ग्रँड फिनालेनिमित्त हा उपक्रम पार पडला.



बहुविकलांग मुलांचे शिक्षण, संगोपन, दैनंदिन गरजा आणि त्यांची काळजी घेणे हे अत्यंत संयम, संवेदनशीलता आणि समर्पणाची गरज असलेले कार्य आहे. या सहाही महिला अत्यंत ममत्वाने आणि निष्ठेने ही जबाबदारी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे गणेशोत्सव, दिवाळी तसेच उन्हाळी सुट्टीच्या काळात अनेक मुलांना पालक घरी घेऊन जाऊ शकत नाहीत. अशा वेळी या महिला स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून केंद्रातील मुलांसोबतच राहतात आणि त्यांची काळजी घेतात. कोणतीही अपेक्षा न ठेवत त्या सातत्याने आणि मनापासून आपले कार्य करत आहेत. या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हास्य हीच त्यांच्या सेवाभावाची खरी पावती आहे. त्यांच्या या निस्वार्थ कार्याला समाजाकडून अधिक कौतुक आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.
विविध शासकीय व सार्वजनिक संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा सामाजिक संस्थांकडून वेळोवेळी गौरव केला जातो. मात्र, अशा विशेष मुलांच्या सेवेत प्रत्यक्ष झोकून देऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचे योगदान अनेकदा व्यापक समाजाच्या लक्षात येत नाही. याच भावनेतून जेसीआय दापोलीने या सहा महिलांच्या कार्याची दखल घेतली.
हा कोणताही औपचारिक सत्कार सोहळा नसून, त्यांच्या अमूल्य आणि निस्वार्थ कार्याप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न असल्याचे जेसीआय दापोलीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी सहाही महिलांना कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या.
या सोहळ्यासाठी जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेएफएम डॉ. कुणाल मेहता, सचिव जेसी एचजीएफ रोशन वेदक, जेसीआय सप्ताह समन्वयक जेएफएम तेजस मेहता, प्रकल्प संचालक जेएफडी कुणाल मंडलीक, प्रकल्प समन्वयक जेसी एचजीएफ विनय शिगवण, जेसी भूषण इस्वलकर, जेसी एचजीएफ सीए ऋषिकेश शेठ, जेसी एचजीएफ मयुरेश शेठ, जेसी प्रसाद दाभोळे, जेसी एचजीएफ अद्नान मुकादम, जेसी रोहन आंब्रे आणि जेसी ऋषिकेश तलाठी उपस्थित होते.
जेसीआय सप्ताहाचा समारोप अशा सेवाभावी कार्याला मानवंदना देत झाल्याने ‘Salute the Silent Stars’ हा उपक्रम माणुसकी, संवेदनशीलता आणि कृतज्ञतेचा सुंदर संदेश देणारा ठरला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













