चिपळूण शहरात दुर्मिळ वन्यप्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Indian Chevrotain अर्थात ‘माऊस डियर’चे दर्शन झाल्याने वन्यजीवप्रेमी, अभ्यासक आणि नागरिकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतातील सर्वात लहान हरिण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्राण्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ मानले जाते.
डी.बी.जे. महाविद्यालय परिसरात राहणारे बाळकृष्ण शंकर पालकर यांना त्यांच्या घरामागील कंपाउंडलगतच्या भिंतीजवळ हा दुर्मिळ प्राणी लपून बसलेला दिसून आला. सुरुवातीला हा नेमका कोणता प्राणी आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र निरीक्षण केल्यानंतर तो ‘माऊस डियर’ असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती परिसरात पसरताच अनेकांनी या दुर्मिळ प्राण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली.
माऊस डियर हा अतिशय लाजाळू व भित्रा स्वभावाचा प्राणी असून तो सहसा दाट जंगल, झुडपे आणि मानवी वस्तीपासून दूर असलेल्या भागात वास्तव्य करतो. हा प्राणी प्रामुख्याने निशाचर असल्याने रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात बाहेर पडतो. त्यामुळे दिवसाच्या वेळेत किंवा मानवी वस्तीजवळ त्याचे दर्शन होणे ही दुर्मिळ बाब मानली जाते.
यापूर्वीही चिपळूणमधील कचरा मैदान परिसरात सकाळच्या वेळी वन्यजीव अभ्यासक डॉ. विक्रम घाणेकर यांना माऊस डियर दिसल्याची नोंद आहे. या दोन्ही घटनांमुळे चिपळूण आणि परिसरातील जंगलांमध्ये या दुर्मिळ प्राण्याचे अस्तित्व अद्याप कायम असल्याचे संकेत मिळत आहेत.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, माऊस डियर हा जैवविविधतेचा महत्त्वाचा घटक असून जंगलातील पर्यावरणीय समतोल राखण्यात त्याची भूमिका महत्त्वाची आहे. जंगलांचे आकुंचन, मानवी हस्तक्षेप आणि अधिवास नष्ट होणे ही त्याच्यासमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्यामुळे अशा दुर्मिळ वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे काळाची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
चिपळूणमध्ये झालेल्या या दुर्मिळ दर्शनामुळे परिसरातील वनसंपदा आणि जैवविविधतेकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे. नागरिकांनी अशा प्राण्यांना त्रास न देता त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि त्यांची माहिती वन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













