चिपळूण : जमिनीच्या वादातून रिक्षा चालकावर चौघांकडून बेदम मारहाण

banner 468x60

चिपळूण शहरातील यशोधन नगर परिसरात हॉटेल काशिराम रेस्ट हाऊस शेजारी जमिनीच्या जुन्या वादातून ६७ वर्षीय ज्येष्ठ रिक्षा चालकावर चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना घडली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात किसन काशिराम भुवड, संजय उर्फ बंड्या किसन भुवड, वैभव किसन भुवड आणि विश्वास भुवड (सर्व रा. पागनाका, गोपाळकृष्णवाडी) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन विठोबा किंजळकर आणि आरोपी भुवड कुटुंबीय यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे. या वादातून अनेकदा तणाव निर्माण झाला होता. मंगळवार, २१ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास संबंधित वादग्रस्त जागेवर आरोपी कोणतीही पूर्वकल्पना न देता मोजणी करत होते.

यावेळी गजानन किंजळकर यांनी त्या ठिकाणी जाऊन मोजणीबाबत विचारणा केली असता, किसन भुवड यांनी संतापून त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. किसन भुवड यांनी किंजळकर यांना हाताच्या ठोशाने मारहाण करत दगडाने डाव्या डोळ्याजवळ वार केला. या हल्ल्यात किंजळकर यांना गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, गोंधळ सुरू असतानाच संजय उर्फ बंड्या भुवड, वैभव भुवड आणि विश्वास भुवड हेही घटनास्थळी दाखल झाले. चौघांनी संगनमत करून “हा एकटाच भेटला आहे, याला तुडवा, सोडू नका, ठार मारा” अशा धमक्या देत किंजळकर यांना जमिनीवर पाडले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्यांच्या पोटावर, पाठीवर व पायांवर बेदम मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिक किंजळकर यांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. घटनेनंतर त्यांनी बुधवारी दुपारी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, शहरात वाढत्या जमिनीच्या वादांमुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *