चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात भरदिवसा झालेल्या कोयता हल्ला प्रकरणात चिपळूण पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्या सात जणांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अब्दुल शेख आणि अमन शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील अन्य पाच संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
आज दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत एकूण तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे चिपळूण परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
बुधवारी (२५ नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले. यावेळी काही जणांनी कोयत्याने सपासप वार केल्याने तिघे जखमी झाले होते.
या हल्ल्यात जखमी झालेल्यांना रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे चिपळूण शहरात मोठी खळबळ उडाली होती. हल्ल्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
सात जणांचा सहभाग असल्याचा संशय
या हल्ला प्रकरणात सात जणांचा सहभाग असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. घटनेनंतर संबंधित संशयित पसार झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता. दरम्यान, मुंबईच्या दिशेने जात असलेल्या अब्दुल शेख आणि अमन शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाच संशयितांचा शोध सुरू
या कारवाईनंतरही प्रकरणातील अन्य पाच संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून वेगवेगळ्या दिशांनी तपास सुरू आहे. उर्वरित संशयितांना लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
बुलडोझर कारवाईनंतर आता पोलीस कारवाईची चर्चा
कोयता हल्ल्याच्या घटनेनंतर संबंधित फळ दुकानावर करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईचीही चिपळूणमध्ये चर्चा झाली आहे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या भूमिकेचं नागरिकांकडून स्वागत करण्यात आल आहे.
आता या प्रकरणात दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.
भरदिवसा झालेल्या या हल्ल्याचे नेमके कारण काय, सात जणांचा या घटनेतील सहभाग कसा होता आणि उर्वरित पाच संशयित कधी पोलिसांच्या ताब्यात येणार, याकडे आता चिपळूणकरांचे लक्ष लागले आहे.
चिपळूण पोलिसांच्या पुढील तपासातून या हल्ल्यामागील संपूर्ण घटनाक्रम आणि कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













