Breaking News
रत्नागिरी : कोस्टगार्डच्या बांधकाम कामातून 8 लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप, नाशिकच्या कंपनी मालकासह चौघांवर गुन्हामहिला कंत्राटदाराची 80 लाख 17 हजारांची थकबाकी, करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम दिल्याची तक्रार चिपळूण : घरात घुसून वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला, 1.80 लाखांचा ऐवज लंपास संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने रत्नागिरी : भरधाव दुचाकीची 11 वर्षीय मुलीला धडक, मुलगी जखमी, दुचाकी चालकाविरुद्ध रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संगमेश्वर : साखरपा स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणी डॉ. विजय नारकरसह तिघांवर गुन्हा, 16 ते 18 आठवड्यांच्या गर्भपाताचा आरोप, डॉक्टर आणि महिलेच्या पतीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

संगमेश्वर : तुळशी विवाहाच्या कार्यक्रमात दोन गटांत राडा, परस्परविरोधी गुन्हे दाखल, सामाईक जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे सामाईक जमिनीच्या वादातून तुळशी विवाहाच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान दोन नातेवाईकांच्या गटांत जोरदार वाद होऊन मारहाणीची घटना घडली. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी दोन गुन्हे नोंदवले आहेत. या घटनांमध्ये एकूण पाच जण जखमी झाल्याची नोंद आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांतील व्यक्ती एकमेकांचे नातेवाईक असून त्यांच्यात सामाईक जमीन आणि जागेवरून दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. हा वाद न्यायप्रविष्ट असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी एका कुटुंबाकडून घरासमोरील तुळशी वृंदावनात तुळशी विवाहाची तयारी सुरू असताना हा वाद उफाळून आला.


पहिल्या गटाची तक्रार; १४ जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी सागर अनंत गुरव (वय ३१, रा. आरवली गुरववाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, तुळशी विवाहाची तयारी सुरू असताना दुसऱ्या गटातील व्यक्तींनी जमाव करून कार्यक्रमस्थळी येत वाद घातला. यावेळी शिवीगाळ करण्यात आली. कार्यक्रम पार पडू द्या, त्यानंतर आपण चर्चा करू, असे सांगूनही वाद वाढल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.


या वेळी आरोपी क्रमांक २ आणि ४ यांनी लोखंडी पाईपने सागर गुरव यांच्या पाठीवर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच संतोष गणपत गुरव आणि रोशन गजानन गुरव यांच्या गालावर, तर संदिप तुकाराम गुरव यांच्या नाकावर मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. इतर व्यक्तींनाही धक्काबुक्की व मारहाण करून शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या तक्रारीवरून अनिकेत सुभाष गुरव, स्वप्नील जयसिंग गुरव, प्रविण विठ्ठल गुरव, शैलेश जयसिंग गुरव यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १५२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५(२) आणि ३५१(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


दुसऱ्या गटाचीही तक्रार; २९ जणांविरोधात गुन्हा
दरम्यान, याच घटनेच्या संदर्भात सुभाष जयसिंग गुरव (वय ५३, रा. आरवली गुरववाडी) यांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मूळ घराच्या ठिकाणी पूजा आणि धार्मिक कार्यक्रमासाठी कुटुंबीय एकत्र जमले असताना दुसऱ्या गटातील व्यक्तींनी जमाव करून कार्यक्रमस्थळी येत वाद घातला.


या वेळी स्वप्नील जयसिंग गुरव यांच्या डोक्यावर लोखंडी पाईपने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच सुभाष गुरव यांना हाताच्या थापटाने आणि बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांच्या मुलगा अनिकेत, भाऊ प्रशांत आणि विलास यांनाही मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय कुटुंबीयांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.


या तक्रारीवरून सागर अनंत गुरव, संदिप अनंत गुरव, दिलीप राजाराम गुरव, जयेंद्र राजाराम गुरव, अजय रामदास गुरव यांच्यासह एकूण २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक १५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, १९१(२), ११८(१), ११५(२) आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


जमिनीचा वाद पुन्हा ऐरणीवर
एकाच घटनेच्या संदर्भात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने आरवली गुरववाडीतील कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. तुळशी विवाहासारख्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी हा वाद उफाळल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन्ही तक्रारींमधील आरोपांची सत्यता तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले असून, कोणत्याही आरोपांची सत्यता अद्याप न्यायालयात सिद्ध झालेली नाही. पोलीस तपासानंतर घटनेचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.