रत्नागिरीतील कोस्टगार्डच्या बांधकाम प्रकल्पातील कामाचे पैसे न देता तसेच संबंधित करार रद्द न करता दुसऱ्या कंपनीला काम देऊन महिला कंत्राटदाराची तब्बल ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. याप्रकरणी नाशिक येथील मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनीच्या मालकासह चार जणांविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आश्विनी सुनील आंबेकर (वय ३४, व्यवसाय इंटिरियर डिझायनर व कंत्राटदार, रा. वारजे, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, १५ जून २०२६ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरीतील कोस्टगार्डच्या बांधकाम प्रकल्पात त्यांनी काम केले होते. मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनीचे मालक दिगंबर आनंदराव पिंगळे यांच्यासोबत करार करून त्यांनी झाडगाव येथील कोस्टगार्डच्या मॅरिड अॅकॅमोडेशन प्रकल्पातील एस प्लस ७ आणि एस प्लस ८ या इमारतींच्या फिनिशिंग वर्कचे काम घेतले होते.
तक्रारीनुसार, एस प्लस ७ इमारतीच्या फिनिशिंग वर्कचे अंतिम बिल ५५ लाख १२ हजार ५०५ रुपये होते. तसेच कोस्टगार्डच्या मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिसेसअंतर्गत ओटीएम गॅरेजच्या आरसीसी स्लॅबच्या लेबर वर्कचे जीएसटीसह बिल २५ लाख ५ हजार ३३१ रुपये होते. अशा दोन्ही कामांची एकूण ८० लाख १७ हजार ८३६ रुपयांची रक्कम संबंधितांकडून मिळणे बाकी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, अंतरा डिझाईन स्टुडिओ या त्यांच्या कन्स्ट्रक्शन फर्मसोबत झालेला कामाचा करार रद्द करण्यात आला नव्हता. असे असतानाही प्राड इन्फ्रा कंपनीने श्रुती असोसिएट्सचे मालक राजू खेतावत यांच्याशी नव्याने करार केला. प्राड इन्फ्रा कंपनीला फिर्यादी यांच्यासोबत काम सुरू असल्याची आणि त्याबाबत वाद असल्याची पूर्वकल्पना होती, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तसेच फिर्यादी यांची ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) न घेता आणि त्यांच्याशी संपर्क न साधता हा नवीन करार करण्यात आला. नव्या करारामध्ये फिर्यादी यांची येणे बाकी असलेल्या रकमेचाही उल्लेख करण्यात आला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काम अधिकृतरीत्या बंद किंवा टर्मिनेट होण्यापूर्वीच दुसऱ्या कंपनीला वर्क ऑर्डर देण्यात आल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप आश्विनी आंबेकर यांनी केला आहे.
कंपनी मालकासह चौघांविरोधात गुन्हा
या प्रकरणी मेसर्स प्राड इन्फ्रा कंपनीचे मालक दिगंबर आनंदराव पिंगळे (रा. नाशिक), प्रकल्प व्यवस्थापक श्रीधर सुरेंद्र लोंढे (रा. पुणे), प्रकल्प समन्वयक दिनेश नाडगोंडे (रा. पुणे) आणि राजू खेतावत (रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.४७ वाजता गुन्हा क्रमांक ३०४/२०२६ नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोस्टगार्डसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पातील बांधकाम कामाच्या आर्थिक व्यवहारातून हा वाद निर्माण झाल्याने प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता, कामाचे करार, वर्क ऑर्डर, बिलांची थकबाकी आणि दुसऱ्या कंपनीला काम देण्यामागील परिस्थिती यांचा तपास झाल्यानंतर या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











