चिपळूण : दोन अवजड ट्रेलरवर पोलिसांची कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल

banner 468x60

चिपळूण : राष्ट्रीय महामार्गावरून अवजड व ओव्हर डायमेन्शनल माल वाहतूक करताना शासनाच्या परवानगीतील अटी-शर्तींचे उल्लंघन करून वाहतूक कोंडी तसेच मानवी जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने ट्रेलर चालविल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

banner 728x90

पहिली घटना ९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे २.१० वाजता पोफळी-सय्यदवाडी येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ (ई) वरील जयमल्हार हॉटेलजवळ घडली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुलदीप सुरेंद्र सिंह (वय २७, रा. रायपूर, छत्तीसगड) हा ट्रेलर क्रमांक CG 07 DD 6843 घेऊन जात होता. या वाहनास ओव्हर डायमेन्शनल माल वाहतुकीसाठी महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर यांनी २५ मे २०२१ रोजी परवानगी दिली होती. मात्र, या परवानगीतील अटी-शर्तींचे उल्लंघन करून तसेच समोरून व मागून येणाऱ्या वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालविल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पोलीस कर्मचारी अरविंद दादासो जमदाडे यांनी फिर्याद दिली आहे.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता याच परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५८/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दयानंद रामदास विश्वकर्मा (वय ३८, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) हा अशोक लेलंड कंपनीचा १४ टायरी ट्रेलर क्रमांक MH 43 Y 8057 चालवत होता. या वाहनालाही ओव्हर डायमेन्शनल माल वाहतुकीची परवानगी होती. मात्र, परवानगीतील अटींचे उल्लंघन करत सार्वजनिक रस्त्यावरून इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होईल आणि मानवी जीवितास धोका अथवा दुखापत होण्याची शक्यता असताना वाहन चालविल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

दोन्ही प्रकरणांमध्ये भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ मधील कलम २२३ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अलोरे-शिरगाव पोलीस या प्रकरणांचा पुढील तपास करत आहेत.

अवजड व ओव्हर डायमेन्शनल वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा तसेच अपघाताचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *