चिपळूण शहरात खळबळ उडवून देणाऱ्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावरील जीवघेण्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने तपास पूर्ण करत महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. अवघ्या १८ ते १९ दिवसांत तपास पूर्ण करून सोमवारी (दि. १३ एप्रिल) चिपळूण येथील न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले. या प्रकरणात चिपळूण नागरी पतसंस्थेच्या १० कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.
मारहाणीच्या या संतापजनक घटनेनंतर पत्रकार संघटनांनी आक्रमक भूमिका घेत निषेध आंदोलनाचा इशारा दिला होता. विशेषतः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र पोलिसांनी भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम ४०० लागू करून पुढील कार्यवाही सुरू केल्याने पत्रकारांनी जाहीर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
तपासादरम्यान फिर्यादी दीपक भागवत यांच्या उपस्थितीत संशयित आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. तसेच भागवत यांच्या पुरवणी जबाबानुसार प्रशांत यादव आणि पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांचेही जबाब नोंदवण्यात आले.प्रशांत यादव यांचा कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासण्यात आला असता, घटनेच्या वेळी ते संगमेश्वर येथे असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या म्हणण्यानुसार सध्या तरी त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. पत्रकारांच्या मागणीनुसार स्वप्ना यादव यांचाही सीडीआर तपासण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपास अधिकारी प्रकाश बेले यांनी दिली.
मारहाणीच्या घटनेच्या ठिकाणचे शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून ते चार्जशीटसोबत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. या फुटेजमुळे घटनाक्रम स्पष्ट करण्यात पोलिसांना मदत झाली असल्याचे सांगण्यात आले. चिपळूण नागरी पतसंस्थेतील एका अधिकाऱ्याला बोलावून त्याच्याकडून व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दहाजणांची ओळख पटवण्यात आली, असेही त्यांनी सांगितले
या प्रकरणात संदीप गणू घुले (मालघर, वाजेवाडी),मंगेश मनोहर महाडिक(मुंडेतर्फे चिपळूण, शिर्केवाडी), सचिन रमेश डेरवणकर (बीजघर, सुतारवाडी, ता. खेड), सौरभ नरेंद्र सुर्वे (बिरमणी वरचीवाडी, ता. खेड), रोहित सुरेश खांबे (मांडकी खांबेवाडी), संकेत दत्ताराम कदम (पेढांबे भराडेवाडी), अभिषेक चंद्रकांत मोहिते (मार्कंडी, चिपळूण), चैतन्य रामचंद्र कदम (खेर्डी, शिवाजीनगर), विनोद लक्ष्मण खेतले (मुंडे, खोतवाडी), प्रशांत आत्माराम पवार (पवारआळी चिपळूण) अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गंभीर कलमांचा समावेश– या प्रकरणात भारतीय न्याय दंड संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १९०, १९१(२), ३०३(२), ११५(२), ३५२, ३५१(२)(३) यांसह विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था अधिनियम २०१७’ अंतर्गतही कलमे लावण्यात आली आहेत, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
चार्जशीट दाखल झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पत्रकारांनी तपास अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेत तपासाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. अल्पावधीत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













