दापोली एसटी बसस्थानकाच्या आगारात बसच्या धडकेत ६९ वर्षीय वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. ५ नोव्हेंबर) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. फातिमा हमीद जोगीलकर (वय ६९, रा. दिवाण खवटी मोहल्ला, ता. खेड, जि. रत्नागिरी) असे जखमी महिलेचे नाव आहे. एसटी बस आगारात प्रवेश करत असताना चालकाचे नियंत्रण सुटून बसची धडक महिलेला बसली. त्यानंतर बसचे पुढील डाव्या बाजूचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांना दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, फातिमा जोगीलकर या गुरुवारी सायंकाळी दापोली एसटी आगारातून पायी बाहेर जात होत्या. त्याचवेळी कोळबांद्रे-बेजेवाडी ते दापोली अशी एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल २१२७) आगारात प्रवेश करत होती. ही बस गोरख सुदाम चिंचकर (वय ४०, रा. जालगाव, दापोली, मूळ रा. कळसम, जि. बीड) चालवत होते.
आरोपी चालकाने रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस भरधाव व निष्काळजीपणे चालवत आगारात प्रवेश केला. यावेळी वळण घेताना बसच्या डाव्या बाजूने फातिमा जोगीलकर यांना धडक बसली. त्यानंतर बसचे पुढील डाव्या बाजूचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्या जखमी झाल्या. या अपघातात त्यांच्या दोन्ही पायांना किरकोळ तसेच गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दापोली पोलीस ठाण्यात एसटी बसचालक गोरख सुदाम चिंचकर यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दापोली एसटी आगारातच हा अपघात घडल्याने प्रवासी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













