मोटारसायकल सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे गेलेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवरुख-तुळसणी मार्गावरील आंबव येथे हा तरुण डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आला होता. त्याला उपचारासाठी प्रथम देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि त्यानंतर रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
केतन संजय मोहिते (वय २८, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन हा गेल्या तीन वर्षांपासून फिट्सच्या आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते.
९ नोव्हेंबर २०२६ रोजी केतन आपल्या ताब्यातील मोटारसायकल सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे घेऊन गेला होता. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास देवरुख ते तुळसणी मार्गावरील आंबव येथे तो रस्त्याच्या कडेला डोक्याला दुखापत झालेल्या अवस्थेत पडलेला असल्याचे बाळकृष्ण कांबळे यांच्या निदर्शनास आले.
केतनला फिटचा झटका आल्याने तो रस्त्याच्या कडेला पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. त्यानंतर बाळकृष्ण कांबळे यांनी तत्काळ त्याला उपचारासाठी देवरुख प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
मात्र, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.२१ वाजण्याच्या सुमारास घडल्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी देवरुख पोलीस ठाण्यात बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे तुळसणी बौद्धवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













