रत्नागिरी : एसटीचे एनसीएमसी स्मार्ट कार्ड आता घरपोच मिळणार, ऑनलाइन स्लॉट बुकिंग सुविधा सुरू, रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार

banner 468x60

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) नोंदणीसाठी आता ऑनलाइन प्राधान्य रांग स्लॉट बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी एसटी कार्यालय किंवा अधिकृत केंद्रावर तासनतास रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. विशेष म्हणजे, प्रवाशांना हे स्मार्ट कार्ड थेट घरपोच मिळवण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.


एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन स्लॉट बुकिंग करता येणार आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी प्रवाशांना आपल्या सोयीनुसार आगाऊ वेळ निवडता येईल. स्लॉट बुकिंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तसेच केंद्रावर प्रत्यक्ष जाणे शक्य नसलेल्या प्रवाशांसाठी कार्ड घरपोच मिळवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.


महामंडळाच्या या नव्या सुविधेमुळे स्मार्ट कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सवलतधारक प्रवाशांना याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.


रत्नागिरी जिल्ह्यात पाच लाख सवलतधारकांकडे स्मार्ट कार्ड
रत्नागिरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख सवलतधारकांनी एनसीएमसी स्मार्ट कार्ड काढले आहे. मात्र, अद्यापही स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी विविध बसस्थानकांवर तसेच खासगी एजंटांकडे प्रवाशांची गर्दी होत आहे.


स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नोव्हेंबर महिन्यापर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे. तोपर्यंत प्रवाशांना पावतीच्या आधारे सवलतीचा लाभ दिला जात आहे.
त्यामुळे ज्यांनी अद्याप स्मार्ट कार्ड काढलेले नाही, अशा सवलतधारक प्रवाशांनी ऑनलाइन स्लॉट बुकिंग किंवा घरपोच कार्ड सुविधेचा लाभ घेऊन वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *