दापोली तालुक्यातील टाळसुरे शेलारवाडी नं. २ येथे भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. घरमालक नोकरीनिमित्त बाहेर गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील सुमारे ३ लाख ९७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला.
याबाबत दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किरण किसन चोगले हे नोकरीनिमित्त खेड येथे गेले होते. त्यांची आई घराजवळील परिसरात साफसफाईचे काम करत असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाजातून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर त्याच ठिकाणी असलेल्या चावीने उघडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १० ग्रॅमची सोन्याची चैन, १ ग्रॅमची बाळी, २ ग्रॅमचे कर्णफुले, ५ ग्रॅमचे झुमके, ४ ग्रॅमची अंगठी, २५ ग्रॅमचे मंगळसूत्र, ४ ग्रॅमचे आणखी एक मंगळसूत्र आणि १ ग्रॅमची कानातील रिंग अशा दागिन्यांचा समावेश आहे. या सर्व दागिन्यांची एकूण किंमत ३ लाख ९७ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घरातील कपाटाची पाहणी केल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे चोगले यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव करीत आहेत.
टाळसुरे परिसरात भरदिवसा घडलेल्या या घरफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*











