मंडणगड : ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छतेचे साम्राज्य, फुटलेल्या गटाराच्या चेंबरमुळे दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव

banner 468x60

मंडणगड भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. रुग्णालय परिसरातील गटाराचे चेंबर फुटल्याने सांडपाणी बाहेर पडून परिसरात साचत आहे. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने भिंगळोली येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. मात्र, याच रुग्णालयाच्या आवारात अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

रुग्णालयाच्या इमारतीजवळील गटाराचे चेंबर फुटलेल्या अवस्थेत असून, त्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी परिसरात पसरत आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास होण्याची शक्यता वाढली असून, परिसरात तीव्र दुर्गंधीही पसरत आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

एकीकडे स्वच्छतेचे आवाहन, दुसरीकडे रुग्णालय परिसरातच अस्वच्छता!

आरोग्य विभागाकडून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रसार रोखण्यासाठी नियमित स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती केली जाते. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखावी, पाणी साचू देऊ नये, असे आवाहनही सातत्याने केले जाते. मात्र, शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातच फुटलेल्या गटाराच्या चेंबरमुळे अस्वच्छता निर्माण होणे ही चिंतेची बाब आहे.

उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना त्याच परिसरात दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छता व्यवस्थापनाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

चेंबर दुरुस्ती आणि स्वच्छतेची मागणी

रुग्णालयाच्या आवारातील फुटलेले गटाराचे चेंबर तातडीने दुरुस्त करावे, साचलेल्या सांडपाण्याचा योग्य निचरा करावा, संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी तसेच डास प्रतिबंधक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या समस्येकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, आरोग्यमंत्र्यांच्या ओएसडींनी (विशेष कार्य अधिकारी) नुकतीच या ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली होती. या दौऱ्यादरम्यान रुग्णालयातील विविध समस्यांचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे या पाहणीनंतर तरी रुग्णालय परिसरातील अस्वच्छतेची समस्या मार्गी लागेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

आता संबंधित आरोग्य प्रशासन आणि जबाबदार यंत्रणा फुटलेल्या चेंबरची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी किती तत्परता दाखवतात, याकडे मंडणगडवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *