खेड : लोटे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; लाखोंच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज!

banner 468x60

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील एम.आर. स्पेशालिटी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत शनिवार, १० ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, काही कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीत आग लागल्याचे निदर्शनास येताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आगीमुळे कंपनीचे नेमके किती नुकसान झाले, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

दरम्यान, या दुर्घटनेची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि खेड पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. आगीचे नेमके कारण काय, कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी होत्या का आणि दुर्घटनेमुळे पर्यावरणावर काही परिणाम झाला आहे का, याबाबत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.

विशेष म्हणजे, या घटनेनंतर कंपनी व्यवस्थापनाकडून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आगीचे स्वरूप, नुकसानीचा आकडा आणि जखमी कर्मचाऱ्यांची नेमकी स्थिती याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

लोटे एमआयडीसी परिसरात वारंवार घडणाऱ्या औद्योगिक दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कंपन्यांमधील अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन उपाययोजना आणि कामगारांच्या सुरक्षिततेबाबत संबंधित यंत्रणांनी अधिक दक्ष राहण्याची गरज व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *