रत्नागिरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरातील मांडवी परिसरात घडली. या घटनेत विवाहिता गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशना इम्रान सुवर्णदुर्गकर (वय ३२, रा. राजीवडा, रत्नागिरी) असे जखमी विवाहितेचे नाव आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२६ पासून २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आशना यांना सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता.
फ्लॅटसाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा
तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार, आशना यांना ‘तू फुकट आली आहेस’, तसेच माहेरून फ्लॅट घेण्यासाठी पैसे आणावेत, अन्यथा मुलाचा दुसरा विवाह करून देऊ, अशा स्वरूपाचे टोमणे व धमक्या दिल्या जात होत्या. या कारणावरून त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे.
तसेच, घराबाहेर जाताना त्यांची पर्स तपासणे, त्यांना किंवा त्यांच्या मुलांना कौटुंबिक कार्यक्रमांना बाहेर जाऊ न देणे आणि घरातील एका खोलीत कोंडून ठेवणे, असे प्रकार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दोन मुलांपासून दूर ठेवल्याचा आरोप
या प्रकरणातील आणखी गंभीर बाब म्हणजे आशना यांच्या दोन लहान मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, आशना यांना मुलांचा सांभाळ करू न देता मुलांना सासरच्या मंडळींकडे ठेवण्यात आले. त्यानंतर आशना यांना एकटीलाच माहेरी पाठवण्यात आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
गेल्या आठ दिवसांपासून आशना आपल्या मुलांना आपल्याकडे देण्याची मागणी करत होत्या. मात्र, सासरच्या मंडळींकडून मुलांना त्यांच्याकडे देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या सर्व घटनांमुळे त्या मानसिकदृष्ट्या त्रस्त झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
मोबाईल घरात ठेवून घराबाहेर पडल्या
या कथित त्रासाला कंटाळून २६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास आशना यांनी आपला मोबाईल घरातच ठेवला आणि राजीवडा येथील घर सोडले. त्यानंतर सायंकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी मांडवी येथील अलहमपार्क परिसरातील एका अपार्टमेंटच्या ‘आय’ विंगच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची घटना घडली.
या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने उपचारासाठी चिंतामणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या उजव्या हाताला, उजव्या पायाला तसेच शरीराच्या अन्य भागांना दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा
या प्रकरणी आशना यांच्या तक्रारीवरून पती इम्रान खलील सुवर्णदुर्गकर, सासरे खलील सुवर्णदुर्गकर, सासू नसिरो सुवर्णदुर्गकर, आत्या सरवरी सुवर्णदुर्गकर आणि परवीन मुनाब सुवर्णदुर्गकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) या पाच जणांविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची पोलिसांकडून पडताळणी केली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदेश वसंत चव्हाण करीत आहेत. घटनेमागील नेमकी परिस्थिती, विवाहितेच्या तक्रारीतील आरोप आणि संबंधित व्यक्तींची भूमिका तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













