खेड तालुक्यातील अस्तान गावातील मेढेकरवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ दामू पवार यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात घुसून बिबट्याने बोकडावर हल्ला केल्याची घटना घडली. त्यानंतर पवार यांच्या घराच्या अंगणातील कुत्र्यालाही बिबट्याने उचलून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण अधिकच वाढले आहे.
दामू पवार यांच्या घराजवळच जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, अस्तान मावळतवाडी ही शाळा असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि ग्रामस्थांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी वनरक्षक परमेश्वर डोईफोडे आणि वनरक्षक वैभव काटेखाये यांनी बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना कोणती काळजी घ्यावी, तसेच लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत माहिती दिली.
बिबट्याच्या हालचालींबाबत नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तातडीने वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले.
या मार्गदर्शन कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, शिक्षिका प्रियांका पाणथवणे, तसेच ग्रामस्थ प्रकाश मोरे, मनोहर साळुंखे, श्रीधर साळुंखे, दिलीप मोरे, दर्शना पवार, दामू पवार, निशा पवार, नितीन पवार, मनिषा पवार, कुमार साळुंखे, वासंती पवार, संदीप पवार, संजना पवार, संज्या पवार आणि अनिल तांबे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर वनविभागाने सातत्याने लक्ष ठेवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थ विकास मोरे यांनी व्यक्त केली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













