दापोली शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून, दापोली शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त ठेवणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ यांनी केले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दापोली शहरातील उत्साही कार्यकारी मंडळाच्या मानाचा गणपती येथे आयोजित ‘लोकसंवाद २०२६’ कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर, मंडळाचे अध्यक्ष संजय घाडगे, माजी नगरसेवक सचिन गायकवाड, संदीप केळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद रानडे आणि शिवाजी गोरे उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा किंवा प्लास्टिक टाकणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी धुमाळ यांनी दिला. दापोलीकर नागरिकांनी यापूर्वीही प्रशासनाला सहकार्य केले असून, भविष्यातही हे सहकार्य कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दापोलीच्या विकासासाठी नगराध्यक्ष कृपा घाग सातत्याने प्रयत्नशील असून, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही शहरातील विकासकामांचा आढावा घेतल्याचे धुमाळ यांनी सांगितले. शहरासाठी १५ कोटी रुपयांचे भव्य नाट्यगृह मंजूर झाले असून, त्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दापोलीच्या इतिहासासाठी आर्ट गॅलरीची मागणी
कार्यक्रमादरम्यान माजी नगरसेवक सचिन गायकवाड यांनी नागरिकांच्या वतीने महत्त्वाची सूचना मांडली. दापोली ही नररत्नांची भूमी असून शहराचा इतिहास, वारसा आणि सांस्कृतिक ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य आर्ट गॅलरी उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या मागणीचे मुख्याधिकारी धुमाळ यांनी स्वागत केले. शहराच्या इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ध्वनी प्रदूषण टाळण्याचे पोलिसांचे आवाहन
पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर यांनी तालुक्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे देखावे सादर करून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळांचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, सणांच्या काळात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचा विचार करून ध्वनी प्रदूषण टाळावे, असे आवाहन तोरस्कर यांनी केले. कायदा सर्वांसाठी समान असून कोणीही कायद्यापेक्षा मोठे नाही. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार संजय घाडगे, संदीप केळकर आणि सचिन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. या लोकसंवाद कार्यक्रमाला दापोली परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













