खेड तालुक्यातील खाडी पट्टा परिसरात पावसाळ्याच्या काळात विनापरवाना चिरे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची चर्चा असून, संगलट, फोपळवणे, बहिरवली परिसरातील मार्गांवर चिऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पावसाळ्यात चिरे उत्खनन तसेच वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन करणे अपेक्षित असताना खाडी पट्टा परिसरातील काही मार्गांवर चिऱ्यांची वाहतूक सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषतः फोपळवणे-संगलट मार्गावर अशा प्रकारची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या प्रकाराबाबत जागरूक नागरिकांनी खेडच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्यावेळी महसूल विभागाला चौकशीचे आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतरही संबंधित प्रकार सुरूच असल्याने प्रत्यक्षात चौकशी अथवा कारवाई झाली आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, चिरे वाहतूक करणाऱ्या काही वाहनांवर दर्शनी भागात नंबर प्लेट नसल्याचेही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. वाहनावर नंबर प्लेट नसणे हा वाहतूक नियमांच्या दृष्टीने गंभीर प्रकार असल्याने संबंधित वाहनांची आरटीओ व पोलिस प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. नंबर प्लेट नसलेल्या वाहनामुळे अपघात अथवा अन्य अनुचित घटना घडल्यास संबंधित वाहनाची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
खाडी पट्टा परिसरात विनारॉयल्टी किंवा आवश्यक परवानग्यांशिवाय चिरे उत्खनन व वाहतूक होत असल्यास महसूल विभाग, खनिकर्म विभाग, आरटीओ आणि पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे तपासणी करणे गरजेचे आहे. संबंधित वाहनांची कागदपत्रे, परवाने, रॉयल्टी तसेच वाहतूक नियमांचे पालन यांची तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाची प्रशासन गांभीर्याने दखल घेऊन खाडी पट्टा परिसरात प्रत्यक्ष पाहणी व चौकशी करणार का आणि विनापरवाना चिरे उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













