दापोली तालुक्यातील प्रमुख मासेमारी बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्णे येथे यंदाच्या मासेमारी हंगामाची सुरुवात मच्छीमारांच्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. हंगाम तब्बल १५ दिवस उशिरा सुरू होणे आणि त्यानंतरही मासळीची अपेक्षित आवक न होणे, यामुळे बोटमालकांसह नाखवा, तांडेल आणि खलाशांच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गणपतीपूर्वी मिळणारी ‘दमाणी’ यंदा कमी मिळण्याची चिन्हे असल्याने मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरवर्षी पावसाळ्यात ठरावीक कालावधीसाठी मासेमारी व्यवसाय बंद ठेवला जातो. यंदा शासनाने १५ ऑगस्टपासून मासेमारी सुरू करण्यास परवानगी दिल्याने हंगामाला नेहमीपेक्षा सुमारे पंधरा दिवस उशिरा सुरुवात झाली. परिणामी गणपतीपूर्वी मासेमारीसाठी मिळणारे दिवसही कमी झाले आहेत.
मागील वर्षी याच कालावधीत मासेमारीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मोठ्या प्रमाणात मासळी जाळ्यात सापडल्याने वाटेकरी मच्छीमारांना चांगली ‘दमाणी’ मिळाली होती. मात्र, यंदा हंगाम सुरू झाल्यानंतरही मासळीची अपेक्षित आवक झालेली नसल्याने मच्छीमारांच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गणपतीपूर्वी मिळणारी ‘दमाणी’ मच्छीमार कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. या रकमेतून गणेशोत्सवाचा खर्च, घरगुती गरजा आणि इतर खरेदी केली जाते. त्यामुळे यंदा दमाणी अपेक्षेप्रमाणे न मिळाल्यास मच्छीमार कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मासेमारीच्या हंगामाच्या सुरुवातीपासून गणपती आगमनापर्यंत बोटीचा मालक, नाखवा, कारभारी तांडेल आणि बोटीवर काम करणारे खलाशी हे मासेमारीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाटेकरी पद्धतीने सहभागी होतात. या उत्पन्नातील वाट्याला स्थानिक भाषेत ‘दमाणी’ असे म्हटले जाते. गणपतीनंतर मात्र मासेमारी व्यवसायाची पद्धत बदलते आणि हंगामाच्या अखेरपर्यंत कामगारांना ‘खपिल’ पद्धतीने ठरावीक पगार दिला जातो.
दरवर्षी दमाणी मिळाल्यानंतर गणपतीपूर्वी मच्छीमारांकडून स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्यामुळे हर्णेतील मासेमारी मंदावल्याचा परिणाम केवळ मच्छीमारांवरच नव्हे, तर स्थानिक व्यापारी आणि बाजारपेठेवरही होण्याची शक्यता आहे. गणपतीपूर्वी मासळीची आवक वाढते का आणि मच्छीमारांना अपेक्षित दमाणी मिळते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













