Breaking News
मंडणगड : आंबेत खाडीतील अडकलेल्या दोन्ही बार्ज हटवण्यात यश, म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गाच्या खोदाईचा फटका, दरड कोसळली, कोळंबेतील कमळजाबाई हायस्कूलवर दरडीचे संकट, 400 विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका चिपळूण: वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात अडकलेल्या कुटुंबाची सुटका, पालिका प्रशासनाच्या तत्परतेमुळे टळली दुर्घटना मंडणगड-म्हाप्रळ मार्गावर शेनाळेजवळ दरड कोसळली वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल दाभोळमध्ये खळबळ – अल्पवयीन मुलीवर ढोरसईमधील नराधमाकडून अत्याचार, पीडिता 5 महिन्याची गरोदर राहिल्याने दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल

देवरुख : दारूच्या नशेत मैत्रीचा शेवट, दारू, वाद आणि मृत्यू; जिवलग मित्रच ठरला खुनी, दारूमुळे मित्रानेच केला खून

banner 468x60

आंबा घाटात जखमी अवस्थेत आढळून मृत्यू झालेल्या तरुणाच्या प्रकरणात धक्कादायक उलगडा झाला असून, जिवलग मित्रानेच कारची ठोकर देत त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी आरोपी आशिष शांताराम भावके याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

banner 728x90

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साईकडे येथील रहिवासी सुधीर अर्जुन यादव हा आपल्या मित्र आशिष भावके (कराड) याच्यासोबत सुमारे आठ दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, काही दिवसांनी आंबा घाटातील महामार्गालगत सुधीर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने त्याला तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत सुरुवातीला अपघाताचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र सुधीरच्या हात-पायांवरील जखमा आणि घटनास्थळी आढळलेले परिस्थितीजन्य पुरावे पाहता पोलिसांना संशय आला. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला.

तपासादरम्यान आशिष भावके याची सखोल चौकशी करण्यात आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आशिषने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांनीही मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते. आंबा घाटातील गायमुख परिसरातून पुढे जात असताना सुधीरने पुन्हा दारू पिण्याचा हट्ट धरला. यावरून दोघांमध्ये वाद झाला.

वाद चिघळत गेल्याने संतप्त सुधीर हा चालू गाडीच्या बोनटवर चढून उड्या मारू लागला. तसेच त्याने कारची समोरील काच फोडली. या प्रकारामुळे संतापलेल्या आशिषने नियंत्रण गमावले आणि रागाच्या भरात गाडी सुरू करून सुधीरला जोरदार ठोकर दिली. या धडकेत सुधीर गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेनंतर आशिषने हे अपघातासारखे भासवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तांत्रिक तपास, घटनास्थळाचा पंचनामा आणि चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरून हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आशिष भावके याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

अनेक वर्षांची घट्ट मैत्री असलेल्या या दोघांमध्ये क्षणिक राग आणि मद्याच्या नशेतून एवढी गंभीर घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना मैत्री, संयम आणि जबाबदारी यांचा गंभीर धडा देणारी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *