दापोली : दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक जखमी

banner 468x60

दापोली-खेड मार्गावरील वाकवली येथे उन्हावरे फाट्याजवळ ३१ मार्च आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


मृत तरुणाचे नाव नरेश चंद्रकांत रुके (वय ३४, रा. जालगाव) असे असून जखमीचे नाव अमित अरुण माने (वय ३५, रा. काळकाई कोंड) असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे अ‍ॅक्टिव्हा (MH 08 BF 3766) या दुचाकीवरून दापोली-खेड मार्गाने जात असताना पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून उलटली आणि अपघात झाला.


अपघातानंतर काही काळ ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. सकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर दोघांनाही तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर नरेश रुके यांना मृत घोषित केले.


दरम्यान, गंभीर जखमी अमित माने यांना पुढील उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.


या प्रकरणी दापोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार वेग, रस्त्याची स्थिती किंवा पहाटेच्या वेळेमुळे आलेला थकवा ही अपघाताची संभाव्य कारणे मानली जात आहेत.


या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *