दापोली : HPV लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा उत्साहात व यशस्वीरित्या पार

banner 468x60

दापोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, दापोली आणि दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उपजिल्हा रुग्णालय, दापोली यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या HPV (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा ए. जी. हायस्कूल, दापोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.

सध्याच्या काळात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने HPV लसीकरण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस प्रभावी ठरते. या पार्श्वभूमीवर दापोलीत राबविण्यात आलेल्या या मोहिमेला समाजातील विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास दशानेमा गुजर युवक संघटनेचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, उपाध्यक्ष निकेत मेहता, तसेच संघटनेचे सदस्य सीए ऋषिकेश शेठ, अथर्व मेहता, सार्थक बुटाला आणि प्रा. कल्पेश तलाठी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने मोहिमेचे यश साध्य झाले.

शाळेच्या वतीने मुख्याध्यापक कांबळे सर, महाजन सर आणि दाभोळे सर यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थिनींना लसीकरणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच पालकांमध्येही जनजागृती करण्यात आली.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे, उपजिल्हा रुग्णालय दापोली येथील डॉ. शताक्षी कुलकर्णी, मळेकर सिस्टर, अस्मिता सिस्टर, जाधव सिस्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष लसीकरण प्रक्रिया पार पाडत मोहिम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

या लसीकरण मोहिमेला विशेषतः शालेय विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद मिळाला. आरोग्यविषयक जागरूकता वाढत असल्याचे यावरून दिसून येत असून, पुढील टप्प्यांमध्येही अधिकाधिक विद्यार्थिनींना लसीकरणाचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, आपल्या शाळा किंवा संस्थांमध्येही अशी HPV लसीकरण मोहीम राबविण्यासाठी इच्छुकांनी दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *