संगमेश्वर तालुक्यातील कडवई बाजारपेठेत २२ मार्च रोजी रविवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत दहशत माजवणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात संगमेश्वर पोलिसांना यश आले आहे. भरवस्तीत तलवार आणि लोखंडी रॉडने धुमाकूळ घालणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिघांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
https://www.facebook.com/share/v/18XN42XzkN/?mibextid=wwXIfr
https://www.instagram.com/reel/DWOfZ-dES7A/?igsh=MWNmMDQxNGEzc3Rwdw==
रविवारी सकाळी सुमारे ९:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी सुरेश दाजी इंजळे (रा. ओकटेवाडी) याने आपल्या साथीदारांसह कडवई बाजारपेठेत प्रवेश करत फरिदा कमाल वागले यांच्या घरासमोर उभी असलेली आलिशान होंडा सिटी (MH-02-AY-8602) कार लक्ष्य केली. गाडी हर्षद मोडक यांची असल्याची खात्री करून घेतल्यानंतर आरोपीने हातातील नंग्या तलवारीने आणि लोखंडी रॉडने कारवर तुफान हल्ला चढवला.
या हल्ल्यामागे वैयक्तिक वाद असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीने हर्षद मोडक यांच्यावर काही महिलांना गाडीतून नेण्याचा आरोप केला असून याच संतापातून ही तोडफोड केल्याचे बोलले जात आहे.
काही क्षणांतच कारच्या काचा फोडून वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. या वेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्ध महिलेलाही धमकावण्यात आले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संगमेश्वर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सुरुवातीला केवळ सुरेश इंजळे याचे नाव समोर आले होते; मात्र पोलीस हवालदार एस. एस. जाधव आणि त्यांच्या पथकाच्या सखोल तपासात धक्कादायक बाब समोर आली. या संपूर्ण घटनेत आरोपीची पत्नी स्नेहल सुरेश इंजळे हिचाही सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पोलिसांनी सुरेश इंजळे, त्याची पत्नी स्नेहल इंजळे आणि त्यांचा साथीदार रोशन लक्ष्मण ओकटे या तिघांना अटक केली. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, या हल्ल्यामागील खरा सूत्रधार कोण, हा प्रकार केवळ वैयक्तिक वादातून घडला की यामागे मोठे षडयंत्र आहे, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













