दापोलीत प्रशासनाचे दुर्लक्ष; नर्सरी रोडवरील विसर्जन तलावाची दुरवस्था

banner 468x60

दापोली शहरातील नर्सरी रोडकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या सार्वजनिक गणपती विसर्जन तलावाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तलावाची दुरवस्था दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. तलावाच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने मोठमोठे दगड थेट तलावात पडले आहेत. त्यामुळे तलावाचा परिसर अस्वच्छ झाला असून पाण्यात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरू लागली आहे.

banner 728x90 banner 728x90

दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान दापोली शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे तसेच घरगुती गणपतींचे विसर्जन या तलावात केले जाते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तलावाचा वापर करणे धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तलावाच्या आजूबाजूला अस्वच्छता पसरल्याने परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत असून आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, तलावाच्या देखभालीकडे प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केले आहे. “दरवर्षी गणपती विसर्जनासाठी या तलावाचा वापर केला जातो. मात्र सध्या तलावातील पाणी दूषित झाले असून भिंती कोसळल्याने परिसर धोकादायक बनला आहे. याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे,” असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

येत्या काही महिन्यांत पावसाळा सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच तलावाची स्वच्छता व दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. पावसाळ्यात पाणी साचल्याने तलावाची अवस्था आणखी खराब होण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येत आहे.

तलावाची दुरुस्ती करण्यासाठी काही ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामध्ये तलावातील साचलेला गाळ आणि कचरा यंत्राद्वारे बाहेर काढणे, कोसळलेली संरक्षक भिंत पुन्हा मजबूतपणे बांधणे, तलावातील दूषित पाणी उपसून पाण्याची स्वच्छता करणे तसेच तलावाच्या कडेला सुरक्षा रॅलिंग बसविणे अशा उपायांचा समावेश आहे.

तसेच तलावाच्या परिसराची नियमित स्वच्छता ठेवून भविष्यात अशी दुरवस्था होऊ नये यासाठी प्रशासनाने ठोस योजना आखण्याचीही गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे. गणेशोत्सव आणि पावसाळा लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून विसर्जन तलावाची डागडुजी करावी, अशी मागणी दापोलीकरांकडून जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *