मंडणगड नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी सापटे यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हाती घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
सुभाष सापटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंडणगड शहरातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच चिपळूण येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सापटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत स्थानिक पातळीवर चर्चा रंगली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सुभाष सापटे यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. तसेच शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेशावेळी उद्योजक संदेश चिले, कल्पेश शिंदे, दिनेश कांबळे आणि प्रवीण दिवेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रामदास कदम यांनी सुभाष सापटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत केले. मंडणगड तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सुभाष सापटे यांच्या पक्षबदलामुळे मंडणगड नगरपंचायत क्षेत्रातील स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश स्थानिक राजकारणातील महत्त्वाची घडामोड मानली जात असून, पुढील काळात मंडणगडमध्ये आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













