दापोली : हर्णे किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले

banner 468x60

हर्णे किनाऱ्यावर एकाच दिवशी दोन ‘इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पोईज’ मृतावस्थेत वाहून आल्याने पर्यावरण व सागरी जीवप्रेमींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हर्णे बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर एक नर जातीचा मृतदेह, तर हर्णे बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर दुसरे लहान पिल्लू अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुरुवारी सकाळी हे मृत प्राणी आढळून आले. हर्णे कांदळवन विभागाचे प्रमुख फहद जमादार यांच्या निदर्शनास हा प्रकार सर्वप्रथम आल्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला याबाबत पाचारण केले.


घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी घटनास्थळी दाखल होत बंदरात आढळलेल्या प्राण्याचे शवविच्छेदन केले. मात्र, या दोन्ही प्राण्यांचा मृत्यू सुमारे आठ ते दहा दिवसांपूर्वीच झाला असल्याचा संशय असून, मृतदेहांची झालेली दुरवस्था आणि मृत्यूस झालेला मोठा कालावधी यामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनानंतरही स्पष्ट होऊ शकलेले नाही, असे डॉ. लोंढे यांनी सांगितले. मोठ्या जहाजाचा धक्का बसल्याने अथवा मासेमारीच्या जाळ्यात अडकल्यामुळे या दुर्मीळ जीवांचा दुर्दैवी अंत झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.


शवविच्छेदनाची आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मृत प्राण्यांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत खोल खड्डा करून सन्मानपूर्वक पुरण्यात आले. या मोहिमेदरम्यान खेडचे कांदळवन विभागाचे अधिकारी अक्षय ढाकणे, विश्वंभर झाडे, वनरक्षक सोनाली हसे, प्रभू साबणे, माजी ग्रामपंचायत सदस्या सना काझी, मुजम्मिल काझी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विशेष म्हणजे, फिनलेस पॉर्पोईज हा सामान्य डॉल्फिन नसून समुद्री सस्तन प्राण्यांच्या स्वतंत्र पॉर्पोईज वर्गातील जीव आहे. डॉल्फिनप्रमाणे पाठीवर स्पष्ट पृष्ठीय पर नसणे हे याचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या सागरकिनारी या प्रजातीच्या नोंदी यापूर्वीही आढळल्या असून, अशा अत्यंत दुर्मीळ प्राण्यांचा अशा रीतीने संशयास्पद मृत्यू होणे ही सागरी जैवविविधतेच्या दृष्टीने गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *