गुहागर : उपचारासाठी नेत असताना आजारी चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, रिक्षा अपघातानंतर रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित

banner 468x60

गुहागर तालुक्यातील धोपावे कुळेवाडी येथील एका वर्षाच्या आजारी चिमुकल्याचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (१३ जुलै) रात्री घडली. या घटनेची गुहागर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोपावे कुळेवाडी येथील स्वयंम सुरेंद्र कुळे (वय १ वर्ष) याची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला रात्री सुमारे ८.१५ वाजता शृंगारतळी येथील डॉ. ढेरे यांच्या दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी तपासणी केली असता बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे लक्षात आले. बाळ कोणतीही हालचाल करत नव्हते तसेच कोणताही प्रतिसाद देत नसल्याने तातडीने पुढील उपचारासाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला.

यानंतर बाळाची आई स्वरा कुळे, नातेवाईक आणि गावातील महिला रमिला रमेश कुळे, कविता किशोर माने, सुप्रिया सुरेश कुळे हे सर्वजण गावातील अनमोल भिकाजी शिरगावकर यांच्या एमएच-०३-बीए-७४२६ क्रमांकाच्या ऑटो रिक्षातून गुहागरकडे रवाना झाले.

रात्री सुमारे ८.३० वाजता मोडकाआगर धरणाजवळील रस्त्यावर असलेल्या गतिरोधकावरून जात असताना रिक्षा पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात रिक्षातील काही प्रवासी जखमी झाले. अपघातानंतरही जखमींसह आजारी बाळाला तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता स्वयंम सुरेंद्र कुळे याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार “Aspiration Pneumonitis” (अन्न किंवा द्रव श्वासनलिकेत गेल्याने फुफ्फुसाला झालेली गंभीर सूज) हे मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २५/२०२६ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास गुहागर पोलीस करीत आहेत.

दरम्यान, याच घटनेत रिक्षा चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हाही गुहागर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाचा तपासही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *