खेड : चोरवणे येथे श्रमदानातून टेपवणे नदीवर बंधारा, तीन दिवसांत जलसंवर्धनाचे काम पूर्ण

banner 468x60

पावसाचे पाणी अडवा आणि जमिनीत जिरवा, या संकल्पनेतून जलसंवर्धनाच्या कामांना ग्रामीण भागात गती मिळत आहे. याचाच प्रत्यय खेड तालुक्यातील चोरवणे येथे आला आहे. दुष्काळ आणि संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने नाम जलसाठा अभियानांतर्गत चोरवणे येथील टेपवणे नदीवर श्रमदानातून विजय बंधारा उभारण्यात आला आहे. ग्रामपंचायत चोरवणे-निवे, ग्रामस्थ, नाम फाउंडेशन आणि अनुलोम यांच्या संयुक्त पुढाकारातून अवघ्या तीन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्रामस्थांनी केवळ आर्थिक किंवा अन्य स्वरूपाचे सहकार्य न करता प्रत्यक्ष श्रमदानातून सहभाग नोंदवला. गावातील महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने या कामात सहभाग घेतला. विशेष म्हणजे महिलांनीही उत्स्फूर्तपणे श्रमदान करत जलसंवर्धनाच्या या उपक्रमाला हातभार लावला. ग्रामविकास मंडळाचे पदाधिकारी आणि सभासदांनीही गावात उपस्थित राहून प्रत्यक्ष श्रमदान केले.

या कामासाठी नाम फाउंडेशनच्या वतीने जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आले, तर मशीनसाठी आवश्यक डिझेलची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली. यामुळे यंत्रसामग्री आणि लोकसहभाग यांचा योग्य समन्वय साधत अवघ्या तीन दिवसांत बंधाऱ्याचे काम पूर्णत्वास गेले.

नदीपात्राची खोली वाढवून ७० बाय १० फुटांचा बंधारा

जलसंधारणाच्या या कामांतर्गत टेपवणे नदीपात्रातील गाळ आणि दगड काढण्यात आले. त्यामुळे नदीपात्राची खोली पाच ते सहा फुटांनी वाढविण्यात आली आहे. याचबरोबर नदीवर ७० बाय १० फूट आकाराचा विजय बंधारा उभारण्यात आला. बंधाऱ्याच्या मजबुतीसाठी पिचिंग, माती आणि प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे.

या कामामुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यास मदत होणार आहे. परिणामी परिसरातील भूजलपातळी वाढण्यासह विहिरी आणि अन्य जलस्रोतांना फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शेती आणि दैनंदिन पाण्याच्या गरजांसाठीही या जलसाठ्याचा उपयोग होऊ शकतो.

नाम फाउंडेशन आणि अनुलोमचा पुढाकार

या संपूर्ण उपक्रमात नाम फाउंडेशनचे प्रथमेश पोमेंडकर, शाहनवाज शाह, अनुलोमचे मयुरेश पाटणकर, ज्ञानेश्वर शिंदे, ग्रामसेवक गणेश पाडवी, माजी उपसरपंच प्रवीण सावंत आणि केंद्रप्रमुख जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाम फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात आणि मल्हार पाटेकर यांच्या पुढाकारातून जलसंवर्धनाच्या कामांना प्रोत्साहन दिले जात आहे. ज्या गावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करण्याची तयारी आहे, अशा गावांना नाम फाउंडेशनच्या माध्यमातून जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र, या मशीनसाठी लागणाऱ्या डिझेलची व्यवस्था संबंधित ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी करायची आहे.

इच्छुक ग्रामपंचायतींना आवाहन

नदी, नाले आणि बंधाऱ्यांमधील गाळ काढून पाणीसाठा वाढविणे, पावसाचे पाणी अडविणे तसेच भूजलपातळी सुधारण्यासाठी इच्छुक ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी नाम फाउंडेशनचे प्रथमेश पोमेंडकर (९५६१३२९२६०) किंवा शाहनवाज शाह (९८२२८२०३९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय यंत्रणांची वाट न पाहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून जलसंवर्धनाचे काम उभे केले, तर गावाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान देता येऊ शकते, हे चोरवणे ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *