खेड शहरातील जगबुडी नदी विसर्जन घाट परिसरातून ८० वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मी गोविंद भोसले असे बेपत्ता महिलेचे नाव असून, त्यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी गोविंद भोसले या १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी कपडे धुण्यासाठी खेड येथील जगबुडी नदी विसर्जन घाटावर गेल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत त्या नदीवर कपडे धुत असल्याची माहिती आहे. मात्र, बराच वेळ उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत.
सायंकाळ झाली तरी त्या घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. नातेवाईक आणि परिचितांकडे चौकशी करूनही त्यांचा शोध लागला नाही. अखेर त्यांचे भाचे मनोज राजाराम मोरे (वय ४०, रा. नवानगर, पालेकर हॉस्पिटल शेजारी, महाडनाका, खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.२८ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५०/२०२६ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी भोसले यांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
बेपत्ता लक्ष्मी गोविंद भोसले यांचे वय ८० वर्षे असून त्या महाडनाका, खेड येथील रहिवासी आहेत. दरम्यान, वृद्ध महिला अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण असून, त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
लक्ष्मी भोसले यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













