दाभोळ : समुद्रकिनारी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला, दाभोळ सागरी पोलिसांकडून ओळख पटविण्याचे प्रयत्न

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ जवळील आघारी गावच्या समुद्रकिनारी शनिवारी (११ जुलै) सकाळी एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्यासाठी आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.

banner 728x90

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता देवजी लक्ष्मण रहाटे हे आघारी गावच्या ग्रामदेवता महामाई देवीच्या पूजेसाठी समुद्रकिनाऱ्याकडे जात असताना त्यांना समुद्राच्या पाण्यावर पांढऱ्या रंगाचा शर्ट तरंगताना दिसला. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सुमारे ५० ते ५५ वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह समुद्रकिनारी पडलेला आढळला.

यानंतर त्यांनी माजी पोलीस पाटील चंद्रकांत कानसे यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यानंतर संबंधित घटनेची माहिती दाभोळ सागरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याचे नाव, गाव अथवा इतर माहिती उपलब्ध झालेली नाही. या प्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तसेच मृताच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *