खेड : महिलेशी शारीरिक संबंध, अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ब्लॅकमेलिंग करून 68 लाख उकळणारा आरोपी मुंबईत जेरबंद, सौदीतून येताच अटक, खेड साखरोलीमधील आरोपी

banner 468x60

खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर सायबर ब्लॅकमेलिंग प्रकरणात सौदी अरेबियात राहणाऱ्या आरोपीला मुंबई येथून अटक करण्यात आली असून, आरोपी गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) या प्रकरणात तब्बल ६८ लाख रुपयांची ऑनलाईन खंडणी उकळल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ६४(२)(D), ३०८(२), ३०८(३), ३५१(२), ३५१(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

banner 728x90

ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार उघड
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (वय ३२, रा. साखरोली, ता. खेड, जि. रत्नागिरी) याने दि. ९ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत फिर्यादी महिलेशी जवळीक साधून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या काळात त्याने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ मोबाईलद्वारे काढले.

यानंतर आरोपीने हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीला सतत ब्लॅकमेल केले. आरोपीने “फोटो कुटुंबीयांना पाठवीन” अशी भीती दाखवत वेळोवेळी पैशांची मागणी केली. या दबावाखाली फिर्यादीने आरोपीला ऑनलाईन माध्यमातून एकूण ६८ लाख रुपये दिले.

पैसे दिल्यानंतरही छळ कायम
फिर्यादीकडून मोठी रक्कम मिळूनही आरोपीची मागणी थांबली नाही. उलट, त्याने आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली. अखेर फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवले व नंतर ते डिलीट केले. या प्रकारामुळे फिर्यादी मानसिक तणावाखाली गेली होती.

सौदीतून परत येताच अटक
दरम्यान, आरोपी जानेवारी २०२६ पासून सौदी अरेबियात नोकरीस होता. त्यामुळे तपासादरम्यान त्यास अटक करणे शक्य झाले नव्हते. मात्र, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी आरोपी कामानिमित्त मुंबईत आल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार खेड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनच्या आधारे मुंबईत सापळा रचला. आरोपी पुन्हा सौदी अरेबियाला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीकडून पुढील मुद्देमाल जप्त केला आहे :

७ लाख रुपये किंमतीची नेक्सॉन चारचाकी गाडी
४० हजार रुपये किंमतीचा आयफोन
३० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग Galaxy S24 Ultra मोबाईल
पासपोर्ट

पोलीस कोठडी
आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २३ एप्रिल २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीसांचे मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. जी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक अहीरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक रोहीदास केंद्रे तसेच पोलीस कर्मचारी विकास पवार, सुरज मोरे व चंद्रमुनी ठोके यांचा समावेश होता.

नागरिकांना आवाहन
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सायबर फसवणूक, ब्लॅकमेलिंग, अश्लील व्हिडिओद्वारे धमकी अशा गुन्ह्यांपासून सावध राहावे. अशा प्रकारच्या घटना घडल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *