चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ५६ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. अशोक कृष्णा राणे (वय ५६, रा. कोळकेवाडी, जोशीवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात शनिवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात दुसरा दुचाकीस्वारही जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कृष्णा राणे हे त्यांच्या मालकीची मोटारसायकल (क्रमांक एमएच-०८-एझेड-०९९६) घेऊन कोळकेवाडी येथून शिरगाव येथे पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. पेट्रोल भरल्यानंतर ते आपल्या घरी परतण्यासाठी निघाले होते. यावेळी पिंपळी बुद्रुक येथे शिरगावकडून चिपळूणच्या दिशेने जाणाऱ्या एचएफ डीलक्स मोटारसायकलने (क्रमांक एमएच-०८-एव्ही-९६०३) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले
या अपघाताची धडक इतकी जोरदार होती की, अशोक राणे हे मोटारसायकलवरून खाली पडून गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमी राणे यांना १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून तातडीने कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
दरम्यान, या अपघातात दुसरी मोटारसायकल चालवणारे संजय श्रीकांत पवार हे देखील जखमी झाले आहेत. त्यांना कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुलाच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा
या अपघातप्रकरणी मृत अशोक राणे यांचे सुपुत्र संकेत अशोक राणे (वय २७) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात जखमी दुचाकीस्वार संजय श्रीकांत पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपळी बुद्रुक येथे घडलेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस पुढील तपास करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













