चिपळूण शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात घडलेल्या दागिने चोरीच्या प्रकरणाचा चिपळूण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गर्दीचा फायदा घेत एका प्रवासी महिलेच्या पर्समधून चोरीस गेलेले सुमारे ११ तोळे, अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी परत मिळवले असून या प्रकरणातील आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना दोन दिवसांपूर्वी चिपळूणच्या गजबजलेल्या मुख्य बसस्थानकात घडली. प्रवासासाठी आलेल्या एका महिलेने आपल्या पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवले होते. बसस्थानकातील प्रचंड गर्दी आणि गडबडीचा फायदा घेत अज्ञात महिलेने क्षणार्धात तिच्या पर्समधून दागिन्यांची चोरी केली. काही वेळाने पर्स तपासली असता दागिने गायब असल्याचे लक्षात येताच पीडित महिलेच्या पायाखालची जमीन सरकली.
घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तातडीने तपासण्यात आले. संशयित व्यक्तींच्या हालचालींचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले तसेच माहितीदारांचे जाळे सक्रिय करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली करणारी एक महिला पोलिसांच्या रडारवर आली. तिची ओळख पटवून पोलिसांनी वेगाने हालचाली करत तिला अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी महिलेकडून चोरीची कबुली मिळाल्यानंतर तिच्याकडून सर्व चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे चोरीस गेलेले सर्व दागिने सुरक्षितरीत्या परत मिळाल्याने पीडित महिलेला मोठा दिलासा मिळाला आहे. बसस्थानकासारख्या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेचा इतक्या कमी वेळात उलगडा करणे ही पोलिसांसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे.
यापूर्वीही काही दिवसांपूर्वी रामपूर येथील भीषण हत्याकांडाचा छडा अवघ्या २४ तासांत लावून आरोपींना अटक करण्यात चिपळूण पोलिसांना यश आले होते. त्या पाठोपाठ या चोरीप्रकरणातही तत्पर तपास करून पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षम नेतृत्वाची छाप पाडली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. चिपळूण पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे शहरभर त्यांचे कौतुक होत असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













