खेडमध्ये संशयास्पद मृत्यू, जंगलात तरुणाचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

banner 468x60

खेड तालुक्यातील तळवटपाल परिसरात एका ३५ वर्षीय तरुणाचा जंगलमय भागात संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावात भीतीचे आणि चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत तपास सुरू केला आहे.

banner 728x90


मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सुरेश पांडुरंग आखाडे (वय ३५, रा. तळवटपाल, गणेशवाडी) असे आहे. ते नेहमीप्रमाणे कामानिमित्त घराबाहेर पडले होते. मात्र बराच वेळ उलटूनही ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला.


शोधमोहीम सुरू असतानाच तळवटपाल-देऊळवाडी दरम्यानच्या डांबरी रस्त्यालगत खालील बाजूस असलेल्या दाट झाडी व जंगलमय भागात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह संशयास्पद अवस्थेत असल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने खेड पोलिसांना माहिती दिली. ही घटना २४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.


घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याबाबत विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.


पोलिसांनी या प्रकरणाचा तपास विविध अंगांनी सुरू केला असून परिसरातील नागरिकांचे जबाब नोंदवले जात आहेत. तसेच मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक तपास आणि शवविच्छेदन अहवालावर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तळवटपाल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *