चिपळूण : मध्यरात्री टॉवरच्या कॅबिनेट रूमचा दरवाजा उचकटून चोरट्यांचा डल्ला,22 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास

Screenshot

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने उभारलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरमधील तीन इन्व्हर्टर बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी टॉवरच्या कॅबिनेट रूमचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला आणि सुमारे २२ हजार ५०० रुपये किमतीच्या बॅटऱ्या लंपास केल्या. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.५५ वाजण्याच्या सुमारास कोंडमळा, ता. चिपळूण येथील एअरटेल मोबाईल टॉवरवर ही चोरी झाली. इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने उभारलेल्या या टॉवरची देखरेख आणि संबंधित कामकाजाची जबाबदारी असलेल्या अक्षय अरुण गाडे (वय ३१, रा. डेरवण फाटा, सावर्डे, ता. चिपळूण) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.


अज्ञात चोरट्यांनी टॉवरच्या कॅबिनेट रूमचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर मोबाईल टॉवरला विद्युत बॅकअप देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमर राजा कंपनीच्या तीन काळ्या रंगाच्या इन्व्हर्टर बॅटऱ्या चोरून नेल्या. प्रत्येक बॅटरीची किंमत ७ हजार ५०० रुपये असून, तीनही बॅटऱ्यांची एकूण किंमत २२ हजार ५०० रुपये आहे.


या चोरीबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्या परवानगीने फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार १७ नोव्हेंबर रोजी रात्री ८.१७ वाजता सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५२/२०२६ नोंदविण्यात आला.


या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्याच चोरीला गेल्याने टॉवरच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, या चोरीमागील आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.