कोकणवासीयांना रेल्वेचा पुन्हा झटका! दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेने फेटाळली

banner 468x60

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरलेली दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी कोकणवासीयांकडून सातत्याने केली जात आहे. मात्र, कोकणवासीयांच्या या मागणीला मध्य रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नकार दिला आहे. परिचालनाच्या दृष्टीने सध्या ही रेल्वेसेवा पूर्ववत करणे शक्य नसल्याचे रेल्वेने माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे. त्यामुळे दादरहून थेट रत्नागिरीला जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या कोकणवासीयांची निराशा झाली आहे.


दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा बंद झाल्यापासूनच ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी आणि कोकणवासीयांकडून केली जात आहे. मुंबईत नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या कोकणातील नागरिकांसाठी ही रेल्वेसेवा सोयीची होती. या पार्श्वभूमीवर नितीन जाधव यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत मध्य रेल्वेकडे या रेल्वेसेवेबाबत माहिती मागवली होती.


या अर्जाला मध्य रेल्वेच्या परिचालन विभागाने उत्तर दिले आहे. त्यामध्ये दादर-रत्नागिरी-दादर (५०१०३/५०१०४) ही पूर्वीची रेल्वेसेवा पुन्हा सुरू करणे परिचालनाच्या दृष्टीने सध्या शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने यासाठी दिवा-दादर विभागातील रेल्वेमार्गाची क्षमता आणि दादर स्थानकातील मर्यादित परिचालन सुविधांचा मुद्दा पुढे केला आहे. दादर स्थानकावर गाड्यांच्या परिचालनासाठी उपलब्ध असलेल्या मर्यादित सुविधा तसेच दिवा-दादरदरम्यान रेल्वे मार्गावरील उपलब्धतेच्या अडचणींमुळे ही सेवा पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.


कोकणवासीयांसाठी सोयीची रेल्वेसेवा
दादर-रत्नागिरी रेल्वे ही कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि सोयीची सेवा होती. या गाडीला कोकणातील विविध छोट्या स्थानकांवर थांबे असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही तिचा मोठा फायदा होत होता. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना कमी खर्चात प्रवास करता येत होता.


विशेषतः चाकरमानी, विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही रेल्वेसेवा उपयुक्त ठरत होती. दादर हे मुंबईतील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असल्याने तेथून थेट रत्नागिरीपर्यंत रेल्वे उपलब्ध झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.


कोकणवासीयांचा पाठपुरावा सुरूच राहणार?
दादर-रत्नागिरी रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असताना मध्य रेल्वेने परिचालनातील अडचणींचे कारण देत असमर्थता दर्शवली आहे. मात्र, या अडचणींवर पर्यायी परिचालन व्यवस्था किंवा अन्य उपाययोजना करून मार्ग काढता येणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.


कोकणवासीयांसाठी महत्त्वाची असलेली ही रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.