रत्नागिरी येथे किराणा दुकानातील सामानाचे पैसे आणि मागील उधारीची रक्कम मागितल्याचा राग आल्याने ग्राहकाने दुकानदारावर लोखंडी सळई आणि चिऱ्याच्या दगडाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरीतील खेडशी नाका येथे घडली. या हल्ल्यात भीमसिंह भवरसिंह पुरोहित (वय ४२, रा. खेडशी नाका, कारवांचीवाडी) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रमेश चंद्रकांत खेत्री (वय ३८, रा. खेडशी, कारवांचीवाडी) याच्याविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास खेडशी नाका येथील श्री सरस्वती सुपर मार्केट या किराणा दुकानात घडली. फिर्यादी भीमसिंह पुरोहित हे त्यांच्या मालकीच्या दुकानात व्यवसाय करत असताना आरोपी रमेश खेत्री हा दुकानात आला. त्याने किराणा सामानाची खरेदी केली.
यावेळी दुकानदार पुरोहित यांनी खरेदी केलेल्या सामानाचे पैसे तसेच यापूर्वीची थकीत उधारी देण्याबाबत आरोपीकडे विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुकानाजवळ पडलेली लोखंडी सळई उचलून पुरोहित यांच्या उजव्या खांद्यावर जोरात प्रहार केला.
एवढ्यावरच न थांबता आरोपीने दुकानाच्या शेजारी पडलेला चिऱ्याचा दगड उचलून पुरोहित यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.२१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९२/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम १०९ (१) आणि ३५२ अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किराणा दुकानातील उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













