जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या 90 किलोमीटरच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या अभिजित पड्याळ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत कोकणचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावला आहे. प्रथमच या स्पर्धेत सहभागी झालेल्या पड्याळ यांनी तब्बल ९ तास ५१ मिनिटांत ही खडतर मॅरेथॉन पूर्ण केली.
दक्षिण आफ्रिकेतील दर्बान ते पीटरमॅरिट्झबर्ग या मार्गावर यंदाची ‘अप रन’ कॉम्रेड मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सतत चढणीचा आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा हा मार्ग जगभरातील धावपटूंना मोठे आव्हान मानला जातो. अशा कठीण स्पर्धेत अभिजित पड्याळ यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशस्वी फिनिश लाइन गाठली.
ऑनलाइन माध्यमातून त्यांनी स्पर्धा पूर्ण केल्याची माहिती समोर येताच रत्नागिरीतील क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विविध क्रीडा संघटना आणि धावपटूंकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
या स्पर्धेत अभिजित पड्याळ हे सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रसाद देवस्थळी यांच्यासोबत सहभागी झाले होते. दोघांनीही रत्नागिरीचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभाग नोंदवला.
अभिजित पड्याळ यांच्या यशाबद्दल सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, टीम कोकण कोस्टल आणि टीम गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन यांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरीत आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉन आणि गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन या स्पर्धांचा प्रचार करण्यासाठीही या संधीचा उपयोग करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेत आलेल्या हजारो धावपटूंना रत्नागिरीत होणाऱ्या या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
आगामी काही वर्षांत जगभरातील धावपटू रत्नागिरीतील या स्पर्धांकडे आकर्षित होतील आणि कोकणची ओळख जागतिक धावपटूंच्या नकाशावर अधिक ठळक होईल, असा विश्वास सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. अभिजित पड्याळ यांच्या या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













