चिपळूण तालुक्यातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेंतर्गत चिपळूण-कराड महामार्गावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली. संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीररीत्या वाहतूक केला जाणारा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आढळून आला. पोलिसांनी आरोपीसह वाहन आणि गुटखा असा एकूण १० लाख १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रत्नागिरी जिल्ह्यात अवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक चिपळूण-कराड महामार्गावर गस्त घालत होते. यावेळी एका वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ते अडवून झडती घेतली.
वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व पान मसाला आढळून आला. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत वाहनासह सर्व मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली.
या कारवाईमुळे चिपळूण-कराड महामार्गावरून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













