संगमेश्वर : शास्त्री नदीत बुडून चुलता-पुतणीचा दुर्दैवी मृत्यू, संगमेश्वर तालुक्यावर शोककळा

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कोंड उमरे येथे शास्त्री नदीत आंघोळीसाठी गेलेल्या ९ वर्षीय पुतणीसह तिच्या ५० वर्षीय चुलत्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

banner 728x90

मिळालेल्या माहितीनुसार, कोंड उमरे येथील रहिवासी रमेश कांबळे यांच्या घरी मिरगाची राखण असल्याने त्यांचे भाऊ संतोष कांबळे हे कुटुंबासह गावी आले होते. संतोष कांबळे यांची ९ वर्षीय मुलगी स्वरा हिने नदीवर आंघोळीसाठी जाण्याचा हट्ट धरल्याने 22 जून दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तिचे चुलते रमेश कांबळे तिला घेऊन शास्त्री नदीतील टवली डोहात गेले होते.

मात्र बराच वेळ उलटूनही दोघे घरी परतले नाहीत. त्यामुळे चिंताग्रस्त नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. नदीकाठी शोध घेत असताना स्वराचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. ही माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर करण्यात आलेल्या शोधमोहीमेत रमेश कांबळे (वय अंदाजे ५०) यांचाही मृतदेह पाण्यात सापडला.

घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास संगमेश्वर पोलीस करीत आहेत.

अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका निष्पाप चिमुकलीसह तिच्या जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चुलत्याचाही मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *