चिपळूण : वृद्ध महिलेचे घर भरदिवसा फोडले, तांब्या-पितळेची भांडी लंपास

banner 468x60

चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचे बंद घर फोडून तांब्या-पितळेसह स्टीलची सुमारे २० हजार रुपये किमतीची भांडी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीनंतर संशयिताने वृद्ध महिलेला शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याची तक्रारही पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

कोळकेवाडी येथील वाघजाई मंदिराशेजारी सुभद्रा सुधाकर कदम (वय ७०) यांचे घर आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत त्यांच्या बंद घराच्या मागील दरवाजाचे कुलूप अथवा दरवाजा अज्ञात हत्याराच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश करण्यात आला.

चोरट्याने घरातील १२ हजार रुपये किमतीचे तांब्याचे चार मोठे हंडे आणि तीन कळश्या, ७ हजार रुपये किमतीचे पितळेचे दोन मोठे टोप व तीन मोठ्या बादल्या, तसेच १ हजार रुपये किमतीच्या स्टीलच्या तीन लहान बादल्या, असा एकूण २० हजार रुपयांचा जुना वापरता ऐवज लंपास केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

दरम्यान, चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर संशयिताने फिर्यादी वृद्ध महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर मारण्यासाठी धावून जात धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी गणेश प्रकाश कदम (वय ४०, रा. कोळकेवाडी) याच्याविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार घरफोडी, चोरी, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, संशयित गणेश कदम याच्याविरोधात यापूर्वीही चिपळूण तसेच अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडी, चोरी आणि अपघातासंदर्भातील विविध गुन्हे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करत आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती आणि सद्य प्रकरणातील त्याची भूमिका तपासली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *