संगमेश्वर : दारूच्या नशेत घरी आलेल्या भावाला जाब विचारला, भावानेच केली मारहाण

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यात दारू पिऊन घरी येण्यावरून जाब विचारल्याने दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. या वादातून एका भावाने दुसऱ्या भावाला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच कांदा कापण्याच्या सुऱ्याने पोटावर आणि मनगटावर वार करून दुखापत केल्याची घटना मेघी-फौजदारवाडी येथे घडली.

ही घटना २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी जखमी दिपक बाबी करंबेळे (वय ४८) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून त्यांचा भाऊ दशरथ बाबी करंबेळे (वय ४७, रा. मेघी फौजदारवाडी, ता. संगमेश्वर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ आपल्या आई-वडिलांसमवेत एकाच घरात राहतात. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याचे तक्रारीत नमूद आहे. २५ ऑगस्ट रोजी दिपक हे दारू पिऊन घरी आल्यानंतर दशरथ याने त्यांना, ‘रोज दारू पिऊन घरी येतोस, घरातील काही काम करत नाहीस, घराकडे लक्ष देत नाहीस,’ असे म्हणत जाब विचारला.

यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. वाद वाढल्यानंतर दशरथ याने दिपक यांना शिवीगाळ करून हाताच्या थापटांनी मारहाण केली. त्यानंतर घरातील कांदा कापण्याच्या छोट्या सुऱ्याने दिपक यांच्या पोटावर आणि डाव्या हाताच्या मनगटावर वार करून त्यांना दुखापत केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्यायसंहिता कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *